Ahmednagar Politics : खासदार कोणतेही असो साकळाईचे उत्तर द्यावेच लागेल… कारण ही लोकशाही आहे !!

बातमीपत्र24 टीम : लोकसभेचे वातावरण आता चांगलेच तापायला सुरवात झाली आहे. अहमदनगर लोकसभेत आता निलेश लंके विरोधात खा. सुजय विखे अशी फाईट होईल हे मात्र निश्चित झाले आहे. एकाचा पक्ष आहे भाजप व एकाचा आहे शरद पवारांची राष्ट्रवादी. पक्ष कोणताही असो किंवा व्यक्ती कोणीही असो महत्वाचे आहे जनतेचे प्रश्न सोडवणे. कुणाची लोकप्रियता किती? कोणाचा पक्ष श्रेष्ठ हे सांगण्यापेक्षा व चर्चा करण्यापेक्षा कुणी किती प्रश्न सोडले किंवा कोणते प्रश्न सोडवले पाहिजे हे महत्वाचे आहे.

नगर दक्षिणेमध्ये जर विचार केला साकळाईचे पाणी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. बहुतेक मागील काही प्रतिनिधींनी यावर काही खास काम केले असे दिसून येत नाही अशी चर्चा आहे. मागील अहमदनगर लोकसभेची लढत याचे मुद्द्यावरून गाजली. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील हा प्रश्न आम्ही सोडवू असे आश्वासन दिले होते. परंतु हे प्रश्न किती सुटलेले हा अत्यंत गहन प्रश्न आहे. आपल्याला वैयक्तिक पक्ष कुणाचा आहे किंवा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नसून हा प्रश्न सुटणे तितकेच महत्वाचे आहे.

साकळाई कृती समितीचा लढा सुरूच
साकळाई कृती समितीचा लढा मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. फेब्रुवारीमध्ये देखील या समितीने अनेक निवेदने संबंधित प्रशासनाला या कामाबाबत दिले होते. त्यामुळे दक्षिणेसाठी महत्वाचा असणारा हा प्रश्न सुटावा यासाठी खासदार विखे यांनी आणखी प्रयत्न करावेत असे त्यांचे म्हणणे होते.

आश्वासनांची पूर्तता कधी होणार?
गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते. परंतु यांची पूर्तता किती झाली हे देखील पाहण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

खासदार कोणतेही असो साकळाईचे उत्तर द्यावेच लागेल…
अनेक उमेदवारांनी आश्वासने दिली, खा. सुजय विखे यांनी देखील आश्वासने दिली होती. आता आणखी कोणी देईल. जनतेला मात्र प्रश्न सुटणे गरजेचे आहे. खासदार कोणतेही असो साकळाईचे उत्तर द्यावेच लागेल. कारण ही लोकशाही आहे व लोकांना लोकप्रतिनिधींद्वारे आपापले प्रश्न सोडवण्याचा अधिकार आहे असे साकळाईच्या पाण्यासाठी तहानलेले लोक म्हणतात आहेत.