आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध उपक्रम पार पडतील. या दौऱ्याआधी अनेक राजकीय वाद, भेद झाले, पण अंतिम हा दौरा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विना सायास पार पडण्याचा उचलेला विदा आज यशस्वी होताना दिसत आहे. दरम्यान या दौऱ्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे भाजपमधील वाढते महत्त्व, राजकीय वजन पुनश्च अधोरेखित झाले आहे.
केंद्रातील सर्वच दिग्गजांची हजेरी
मंत्री विखे यांच्या शिर्डी मतदार संघात केंद्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. पंतप्रधान मोदी असोत, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा असोत किंवा संरक्षण मंत्री राजनाथसिंह असोत या सर्वानीच विखे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे. जेथे अनेकांना जाण्यासाठी वेळ घ्यावी लागते किंवा अनेकांना वेळ मिळतही नाही अशा दिग्गजांच्या भेटी घ्यायला विखे यांना वेळ लागत नाही. त्यांच्या भेटीसाठी विखे यांना कधी राज्यातील भाजप नेत्यांच्या मध्यस्थीची गरज पडली नाही.
भाजपमध्ये वाढले वजन, अनेकांना शह
सहकारावरील वर्चस्व ही विखे-पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहेच शिवाय प्रबळ शरद पवार विरोधक ही ओळख भाजपमधील विखे यांचे राजकीय वजन वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. अवघ्या पाच वर्षात विखे यांनी पक्षातील राष्ट्रीय नेत्यांशी जवळीक निर्माण केली आहे. जेव्हा विखे यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भाजपमधील बहुतांशी नेत्यांनी विरोधच केला होता. परंतु पक्षीय पातळीवर त्याची दखल घेतली न गेल्याचे दिसले. पक्ष प्रवेश झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्या. परंतु यात भाजप आमदार काही पराभूत झाले. त्यांनी एकत्र येत विखे यांच्यामुळे पराभव झाल्याची फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. परंतु घडले काहीच नाही. उलट विखे वेगाने पुढे निघून गेले. आणि आता त्या पक्षांतर्गत विरोधकांना त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागले. किंवा तसे भाग पडले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात जी सत्तानाट्ये झाली अशा नाट्यमय स्थितीत देखील त्यांनी स्वतःकडे दोन जिल्ह्याची पालकमंत्रीपदे व महसूल खाते स्वतः जवळ ठेवण्यात यश मिळवले. यातून त्यांचे भाजपमधील वाढते वजन स्पष्ट जाणवते.
मोदींचा शिर्डी दौरा अन विखेंच महत्व पुन्हा अधोरेखित
आजच्या शिर्डी दौऱ्यामुळे विखेंच महत्व पुन्हा अधोरेखित झालंय. आज हजारो कोटींचा कामांचा प्रारंभ होईल. राज्यातील महत्वाची नमो शेतकरी योजना सुरु होईल. भाजपमधील अनेक दिग्गजांना जे जमलं नाही ते आजच्या दौऱ्यातून विखे पाटील साध्य करतील. यातून त्यांचे राजकीय महत्व व भाजपमधील वाढते वजन अधोरेखित होईल.