तालुक्यातील जांब कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्गखोली गेल्या तीन महिन्यांपूर्वी पावसामुळे कोसळली होती. शिवसेनेच्या पाठपुरावानंतर आता जिल्हा परिषदे कडून नवीन वर्ग खोली मंजूर झाली असून त्यासाठी बारा लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी दिली.
जांब येथील जिल्हा परिषद शाळा 27 जुलैला भिज पावसाने कोसळली होती.सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवित हानी घडली नाही. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गखोली उपलब्ध नसल्याने शाळा मंदिरात तर कधी ग्रामस्थांच्या घरात भरावी लागत होती.
विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेनेचे जि.प.सदस्य संदेश कार्ले, पं.स.सभापती संदीप गुंड, युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांच्यावतीने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात साहेब, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी(प्राथमिक) भास्कर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शाळा खोलीला तात्काळ मंजुरी दिली.
त्यामुळे आता लवकरच शाळा खोली बांधण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रश्न सुटणार असल्याने जांब येथील मुख्याध्यापिका, ग्रामस्थ व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.