अहिल्यानगर : गुणवंत विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी ओळख असते, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून गुणवंत आणि संस्कारशील विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले.
मेहेकरी (तालुका नगर) येथील सदगुरु विद्यालयाचे प्राचार्य विकास गोबरे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम बुधवारी (दि.२९) पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दरे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जी. डी. खानदेशी, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, संस्थेच्या सदस्या निर्मला काटे, ज्येष्ठनेते भगवानराव बेरड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव सुंबे, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी प्राचार्य ए. आर. दोडके, प्राचार्य पोकळे, सरपंच नंदू पालवे, माजी सरपंच म्हातारदेव पालवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पालवे, स्कुल कमिटीचे सदस्य शिवाजी पालवे, दक्षता समितीचे अध्यक्ष संतोष करपे, युवा उद्योजक प्रवीण कदम, विठ्ठलराव बेरड, समन्वयक रमेश चौधरी, सभापती संदीप गुंड, माजी सरपंच योगेश लांडगे, दक्षता कमिटीचे उपाध्यक्ष सुधीर वायकर, सत्यजित पालवे, शशी पालवे, सचिन पंडित, राजीव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्तीबद्दल प्राचार्य विकास गोबरे व सुजाता गोबरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड तसेच कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य श्रीकांत कातोरे यांनी केले.
सद्गुरू विद्यालयामध्ये संस्थेच्या माध्यमातून व लोकसहभागातून प्रा. गोबरे यांनी या विद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षकाने नेहमी विद्यार्थी व संस्थेशी प्रामाणिक राहावे विद्यालय हेच कुटुंब समजून गोबरे यांनी या विद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवले आणि म्हणूनच या विद्यालयाला तीन लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन राज्य शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे नगर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
आई, वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतून मला शिक्षण दिलं. त्यांच्या कष्टामुळेच मला व माझ्या मुलांना चांगले संस्कार मिळाले. आई, वडील खूप थकलेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी मी वेळेआधीच सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. संस्था आणि विद्यार्थी सर्वांशी प्रामाणिक राहिलो असल्याचे सांगताना यावेळी प्राचार्य गोबरे खूपच भावनिक झाले होते.