बातमीपत्र24/ टीम : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होत असून मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य व निर्णायक मतदान नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून आहे. नगर तालुक्यात भाजपा युतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
श्रीगोंदा मतदार संघात नगर तालुक्यातील वाळकी, चिचोंडी पाटील गट जोडला असल्याने येथील मतदारांचा कौल हा श्रीगोंद्याचे आमदार ठरविण्यात नेहमीच निर्णायक ठरत आला आहे. तालुक्यात भाजपा व उबाठा शिवसेना यांची मोठी ताकद व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येथे पाचपुते व नागवडे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच चालू असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील मतदार पाचपुतेंना कौल देणार की नागवडेंना याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. गावोगावी महाविकास आघाडी तसेच महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले असून दोन्हीकडूनही आपल्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
नागवडे तसेच पाचपुते समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी तालुक्यातील मतदार कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून नागवडे अन् पाचपुते यांच्यामध्ये मोठी चुरस पहावयास मिळत आहे.
श्रीगोंदा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या दोन्ही गटांमध्ये भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे प्राबल्य आहे. त्यांचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गावोगावी नागवडे तसेच पाचपुते यांच्या गाव भेटी,
प्रचार दौरे, चौक सभा पार पडत असून दोन्ही समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. एकंदरीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य हे नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील मतदारांनी दिलेला कौल हा निवडणुकीत निर्णायक ठरत असतो.