Batamipatra24 Team : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या २६ व्या पदवीदान समारंभामध्ये ही पदवी प्रदान केली जाणार आहे.
मंत्री विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित केले होते.
मंत्री विखे पाटील यांनी आपल्या राजकीय, सामाजिक वाटचालीत अनेक महत्वपूर्ण पदांवर काम करुन, सामाजिक हिताचे निर्णय घेतले. या मध्ये प्राध्यान्याने कृषी व पणन मंत्री असताना शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली. शेतकरी ते ग्राहक ही योजना पहिल्यांदा राज्यात सुरु करुन शेतक-यांच्या उत्पादीत मालाला नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेतकरी गट आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना त्यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले होते.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा सहकार चळवळीचा वारसा त्यांनी पुढे घेवून जातानाच सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बॅकींग क्षेत्र आणि सहकारी पतसंस्था चळवळीलाही त्यांनी पाठबळ देत सहकार क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देतानाच कौशल्य शिक्षणालाही त्यांनी मोठे प्राधान्य दिले आहे.
मंत्री विखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मान केल्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.
”वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मलाही ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी विद्यापीठाच्या सर्व पदाधिका-यांचा आभारी आहे. राजकीय, सामाजिक जीवनात मिळालेल्या संधीमधून समाजासाठी काम करत आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळसाहेब विखे पाटील यांच्या विचारांचा वारसा घेवून शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अधिकचे काम करण्यासाठी हा मिळालेला सन्मान माझ्यासाठी एक उर्जा असल्याची प्रतिेक्रीया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.